कोईंम्बतूर- कोईम्बतूरमधील भाजपाच्या जिल्हा कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. बुधवारी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडल्याचं समजतं आहे. दोन पेट्रोल बॉम्बपैकी एक बॉम्ब इमारतीवर असणाऱ्या फ्लेक्स बोर्डावर आदळला तर दुसरा बॉम्ब पक्ष कार्यालयासमोरील वीकेके मेनन रोडवर फुटला. पक्ष कार्यालयात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
कोईंम्बतूरमधील भाजपा कार्यालयाबाहेर ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने बॉम्ब फेकणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करण्याचा केला पण त्या व्यक्तीला पकडण्यात यश आलं नाही. घटनेची माहिची मिळताच पोलीस उपायुक्त पी पेरूमल व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची चौकशी केली. दरम्यान, पक्ष कार्यालयाबाहेर जास्तीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तीन विशेष पथकांकडून बॉम्ब फेकणाऱ्या अज्ञाताचा शोध घेतला जातो आहे.
पेरियार समाजाचे काही सदस्य या हल्ल्यामागे असतील, असं आम्हाला वाटतं. घटनास्थळावरून पुरावे जमा केले असून हल्लेखोराला लवकरच पकडलं जाईल, असं पोलीस उपायुक्त पेरूमल यांनी म्हंटलं.
भाजपाचे नेते एच.राजा यांच्या ट्विटनंतर ही घटना घडली आहे. लेनिन कोण आहेत, लेनिन व भारताचा काय संबंध? भारत आणि कम्युनिस्टमध्ये काय संबंध? आज त्रिपुरामध्ये लेनिन यांची प्रतिमा हटवली गेली आणि उद्या तामिळवाडूमध्ये ई वी रामासामी यांची प्रतिमा असेल, असं ट्विट राजा यांनी केलं होतं. पण नंतर राजा यांनी ही पोस्ट डिलीट केली.
त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेनिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तामिळनाडूमधील वेल्लूर येथे घडलेल्या या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. लेनिन यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्यानंतर आता तामिळनाडूमध्ये पेरियार यांचे पुतळे पुढील लक्ष्य असल्याचे वक्तव्य भाजपा नेते एच. राजा यांनी केल्यानंतर काही तासांतच हा प्रकार घडला.