नवी दिल्ली - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. राजस्थानमध्ये तर लतादीदींचे कोट्यवधी चाहते आहेत. लता मंगेशकर यांचे राजस्थानशी खास नाते आहे. १९९० साली लता मंगेशकर यांनी राजस्थानमधील 'केसरिया बालम' हे सप्रसिद्ध गाणं गायलं होतं. ते गाणं १९९१ मध्ये रिलीज झालं होतं. हे गाणं अवघ्या जगभरातील चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं.
१९९१ मध्ये 'लेकिन' हा अल्बम प्रदर्शित झाला होता. हे गीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी कम्पोज केलं होतं. जवळपास तीन दशकांपूर्वी राजस्थानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरीबांच्या मदतीसाठी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी लतादीदी या जयपूरला आल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास ४० हजार प्रेक्षक आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांनी तिकीट काढून सवाई मानसिंह मैदानात प्रेक्षकांमध्ये बसून लतादीदींचे गाणे ऐकले होते. भीषण दुष्काळात पीडितांच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांनी १ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश हरिदेव जोशी यांच्याकडे सुपूर्द केला होता.
लता मंगेशकर यांच्या आवाजानं प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची हजारो गाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं.
लता दीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं युक्त राहील.