उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी नवी घोषणा दिली आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत, अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिर बांधले जात आहे, आता मथुरेचा नंबर आहे, असे म्हटले आहे. यावरून भाजप आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (UP Assembly Election 2022, Ayodhya, Kashi, Mathura)
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत म्हटले आहे, ''अयोध्या काशीत भव्य मंदिर बांधणे सुरू आहे, मथुरेची तयारी आहे. याच बरोबर त्यांनी जय श्रीराम, जय शिव शम्भू आणि जय श्री-राधे कृष्ण हॅशटॅगही जोडला आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमी सह 'यलो झोन'ची सुरक्षितता वाढवली -यापूर्वी, अनेक संघटनांनी मथुरेतील शाही ईदगाहमध्ये जलाभिषेक आणि संकल्प यात्रेचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह परिसराबरोबरच जवळपासच्या भागांत बंदोबस्त वाढवला आहे. याच बरोबर जिल्हा प्रशासनानेही सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारे विवादास्पद कारवाईत सहभागी न होण्याचे अथवा सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट न टाकण्याचे आवाहन केले आहे. तसेच, असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.
वादग्रस्त जागेवरून शाही ईदगाह हटवण्याची मागणी करत, अखिल भारत हिंदू महासभा, श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलन समिती, नारायणी सेना आणि स्वतःला भगवान कृष्णाचे अनुयायी म्हणवून घेणाऱ्या लोकांनी मथुरेतील दिवाणी न्यायाधीशांच्या (वरिष्ठ विभाग) न्यायालयात वाद दाखल केला आहे. तो विचाराधीन आहे.