नवी दिल्ली :
भारतीय वाहन उद्योगातील दिग्गज आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे मानद चेअरमन केशुब महिंद्रा यांचे बुधवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.
त्यांनी तब्बल ४८ वर्षे महिंद्राचे चेअरमनपद सांभाळून समूहाचे यशस्वी नेतृत्व केले. महिंद्रा समूहाचा माहिती तंत्रज्ञान (आयटी), रिअल इस्टेट, वित्तीय सेवा आणि आतिथ्य क्षेत्रात विस्तार करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते.
२०१२ मध्ये त्यांनी आपले पुतणे आणि समूहाचे तत्कालीन व्हाईस चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा यांच्याकडे कंपनीची सूत्रे सोपविली.
हरीश आणि केशुब महिंद्राजी हे दोघेही माझ्या परिवाराच्या अत्यंत निकटचे होते. ते प्रसंगोपात्त बाबूजींना भेटायला येत असत. अत्यंत मृदूभाषी, स्पष्टवक्ते आणि तत्त्वनिष्ठ असलेले केशुबजी खंदे राष्ट्रवादी होते. उद्योगाचा पितामह हरपला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया एडिटोरियल बोर्ड आणि माजी राज्यसभा सदस्य.