अयोध्येमध्ये आता जगभरातील कंपन्यांना त्यांचे आऊटलेट उघडायचे आहे. दिवसाला दोन ते तीन लाख लोक तिथे पोहोचत आहेत. अशावेळी त्यांच्या नाश्ता, जेवणाची सोय करावी लागणार आहे. याचा फायदा जगभरातील कंपन्यांना उचलायचा आहे. अयोध्येत केएफसीसारख्या कंपन्यांना त्यांचे आऊटलेट खोलायचे आहे. परंतु, या कंपन्यांना तिथे एक अट घालण्यात आली आहे.
२२ जानेवारीपासून अयोध्येत राम मंदिरात रामललाच्या दर्शनासाठी झुंबड उडाली आहे. अयोध्येचे डीएम नितीश कुमार म्हणाले की केएफसीसह सर्व ब्रँड अयोध्येत त्यांचे आउटलेट उघडू शकतात. त्यांचे स्वागत आहे. पण, या कंपन्यांनी अयोध्येतील ज्या भागात मांसाहार आणि मद्य देण्यावर आणि विक्रीवर बंदी आहे, तिथे दुकाने उघडली तर त्यांना त्यांच्या मेनूमध्ये बदल करावा लागेल.
केएफसी अयोध्येतील प्रतिबंधित भागात मांसाहारी पदार्थ देऊ शकणार नाही. अयोध्येच्या उर्वरित भागात आउटलेट उघडण्यावर कोणतेही बंधन नाही. ते तेथे त्यांचे मांसाहारी पदार्थही पाठवू शकतात, असे कुमार म्हणाले.
यामुळे अयोध्येत केएफसी सारख्या ब्रँडची दुकाने उघडण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. केएफसी, मॅकडोनाल्ड, बर्गरकिंग सारखे ब्रँड नॉनव्हेजबरोबर व्हेज पदार्थही विकतात. परंतु जर नॉनव्हेज विकायचे असेल तर या कंपन्यांना प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी आऊटलेट उघडावी लागणार आहेत.