नवी दिल्ली - ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच दरम्यान आता लवकरच गायीच्या शेणापासून बनवलेलं "वैदिक पेंट" (Vedic Paint) बाजारात दाखल होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंबंधीची माहिती दिली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून वैदिक पेंटची निर्मिती केली जाणार आहे. ग्रामीण अर्थवस्थेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
"ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचं साधन मिळावं यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून लवकरच वैदिक पेंट बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. वैदिक पेंट हे डिस्टेंपर आणि इमल्शन अशा दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. हे पेंट पर्यावरणपूरक, नॉन टॉक्सिक, अॅन्टी बॅक्टेरिअल, अँटी फंगल आणि वॉशेबल आहे. घराला रंग दिल्यावर केवळ चार तासांत हे पेंट सुकणार आहे" अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे.
"वैदिक पेंटमुळे पशूधन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात अंदाजे 55 हजार रूपयांची वाढ होऊ शकते" असं ही नितीन गडकरी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी वेदिक पेंटच्या डब्याचे काही फोटो देखील शेअर केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात खादी उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. वोकल फॉर लोकलचा नारा पंतप्रधानांनी दिल्यापासून सर्वत्र आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तू विकत घेण्याकडेही अनेकांचा कल वाढला आहे.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी काही दिवसांपूर्वी गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च केली होती. या चिपमुळे मोबाईलमधून पसरणारे रेडिएशन कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. "गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली चिप तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण अतिशय कमी होतं. तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असल्यास ही चिप अतिशय प्रभावी ठरेल" असं कथिरिया यांनी सांगितलं होतं. या चिपला गौसत्व कवच असं नाव देण्यात आलं असून त्याची निर्मिती राजकोटमधील श्रीजी गौशाळेकडून केली जाते. राष्ट्रीय कामधेनू आयोग केंद्रीय मत्सोत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.