नवी दिल्ली : ‘खादी’ हे नाव अनेकांना परिचित आहे. अनेकांनी या नावावरून व्यवसायही सुरू केला आहे. मात्र, आता या नावाचा व्यवसायासाठी वापर करता येणार नाही. ‘खादी’ आणि ‘खादी इंडिया’ या ट्रेडमार्कची मालकी खादी ग्रामोद्योग आयोगाकडे असल्याचा निर्वाळा ‘नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडियन डोमेन डिस्प्युट पॉलिसी आर्बिट्रेशन ट्रिब्युनल’ने दिला आहे.
खादी हे एक सर्वसाधारण शब्द असल्याचा दावा लवादाने फेटाळला आहे. ‘खादी’ नावाच्या वापरावरून खादी ग्रामोद्योग आयोगाने लवादाकडे तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील जितेंद्र जैन व त्यांच्या सहकाऱ्यांनी खादी.इन या नावाने वेबसाईट सुरू केली होती. आयोगाने नोंदणी केलेले ‘खादी’ आणि ‘खादी इंडिया’ या ट्रेडमार्कशी साधर्म्य असलेली नावे वेबसाईटसाठी वापरून संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र, या नावांवर आयोगाचा हक्क आहे. त्यामुळे इतरांना ती वापरता येणार नाही, असे लवादाने स्पष्ट केले आहे. संबंधित संकेतस्थळाच्या नावाची मालकी आयोगाकडे हस्तांतरित करण्याचे आदेशही लवादाने दिले.