प्रमोद गवळी,
नवी दिल्ली- माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे गुरुवारी दिल्लीत पंतप्रधानांपासून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंतच्या नेत्यांपुढे आपली व्यथा मांडण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी डेरेदाखल झाले खरे, पण नितीन गडकरी यांच्याशिवाय त्यांना कोणाचीच भेट मिळू शकली नाही. शुक्रवारी ते हात हलवत मुंबईकडे निघाले. खडसे कोणत्या उद्देशाने आले होते, त्यांनी चुकीची वेळ निवडली काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.परदेश दौऱ्यावरून परतल्या परतल्या पंतप्रधान वेळ देणार नाहीत, हे माहीत असूनही त्यांनी प्रयत्न केले. अमित शहा दिल्लीतही नव्हते. खडसे बाजू मांडण्यासाठी येथे आले होते. दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी खडसे यांनी आपण अलाहाबादेत पक्षनेत्यांना भेटणार असल्याचे काहींना सांगितले. अलाहाबादेत भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. खडसे कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकतात; मात्र अखेरच्या क्षणी काय होईल, हे सांगता येत नाही.