चंदीगढ: पंजाबचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते बिआंत सिंग यांच्या हत्येबद्दल दोषी ठरलेल्या जगातार सिंग तारा या खलिस्तानवादी आरोपीस सत्र न्यायाधीश जे. ए. सिद्धू यांनी शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.शिक्षा सुनावताच ताराच्या समर्थकांनी खलिस्तानवादी घोषणा दिल्या. ताराने न्यायालयास सांगितले की, कृत्याचा मला जराही पश्चात्ताप नाही. हजारो निरपराधांचे प्राण वाचविण्यासाठी एका निर्दयी व्यक्तीला संपविणे चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. शिखांच्या स्वातंत्र्याचा माझा लढा सुरुच राहील!खलिस्तानवाद्यांनी पंजाब व हरियाणा सचिवालयाबाहेर ३१ आॅगस्ट १९९५ रोजी घडवून आणलेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात बिआंत सिंग यांच्यासह १७ जण ठार झाले होते. पंजाब पोलीस दलाचा शिपाई दिलावर सिंग याने हा आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या खटल्यातील नऊ आरोपींना अटक झाली तर सहा आरोपी फरार आहेत. जगतार सिंग तारा, जगतार सिंग हवारा आणि परमजीत सिंग भेओरा हे तिघे २००४ मध्ये चंदीगड तुरुंगातून भुयार खणून पळाले होते. याआधी ज्यांना शिक्षा झालेल्या जगतार सिंग हवारा व बलवंत सिंग राजोआना यांना फाशी ठोठावली. अपिलात उच्च न्यायालयाने हवारा याची फाशी रद्द करून त्यास जन्मठेप दिली. राजोआना याने अपील केले नाही. तो फाशीच्या प्रतीक्षेत कारागृहात आहे. (वृत्तसंस्था)
बिआंत सिंग हत्या खटल्यात खलिस्तानी खुन्याला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:55 PM