Bangladesh EX PM Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारची सूत्रे हाती घेतली आहेत. दुसरीकडे, हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी आल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सोमवारी (५ ऑगस्ट) बांगलादेशमधून पलायन केले आणि त्या भारतात आल्या आहेत. हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला असला तरी अद्याप ब्रिटनने त्यांना त्यासाठी परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शेख हसीना या आणखी काही काळ भारतातच राहणार असण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, शेख हसीना यांच्या कट्टर विरोधक असलेल्या खलेदा झिया यांच्या पक्षाने भारताला इशारा दिला आहे.
खलेदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने शेख हसीना यांना भारताने आश्रय दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने भारताने पदच्युत शेख हसीना यांना दिलेल्या आश्रयाला विरोध केला. खलेदा झिया यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते आणि बांगलादेशचे माजी मंत्री गायेश्वर रॉय यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तुमच्या पक्षात भारतविरोधी भावना आहेत का सवाल रॉय यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना रॉय यांनी बांगलादेश आणि भारत यांनी परस्पर सहकार्य केले पाहिजे, असं म्हटलं. तसेच भारत सरकारला परस्पर सहकार्याच्या भावनेनुसार वागावे लागेल असेही रॉय यांनी म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना रॉय यांनी शेख हसीना यांच्या भारतातील उपस्थितीबाबत भाष्य केलं. "बांग्लादेश आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचे बीएनपी पक्ष समर्थन करतो. तुम्ही जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत केली तर दोघांमधील परस्पर सहकार्याचा सन्मान करणे कठीण होईल. आआमच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी येथे सांगितले होते की, भारत शेख हसीनाला पुन्हा सत्तेत आणण्यास मदत करेल. शेख हसीना यांची जबाबदारी भारत उचलत आहे. भारतीय आणि बांगलादेशी लोकांना एकमेकांशी कोणतीही अडचण नाही. पण भारताने संपूर्ण देशापेक्षा एकाच पक्षाला (अवाली लीग) उचलून धरणे योग्य आहे का?, असा सवाही रॉय यांनी केला.
यावेळी रॉय यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवरील होत असलेल्या हल्ल्यांबद्दलही त्यांनी भाष्य केलं. बांगलादेशातील विविध समुदायांचे लोक बीएनपी बनवतात आणि आमचा पक्ष हा सर्व समुदायांच्या वैयक्तिक हक्कांवर विश्वास ठेवतो," असे गायेश्वर रॉय म्हणाले.
ढाकासह देशाच्या अनेक भागात अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यवसायांची तोडफोड करण्यात आली आहे. लोकप्रिय लोक बँड गानचा प्रमुख गायक राहुल आनंदा याच्या निवासस्थानीही तोडफोड आणि नासधूस केली आहे. त्यामुळे गायक राहुल आनंदा आणि त्याचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत.
भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी घटक बांगलादेशचा वापर करत असल्याच्या आरोपांवरही रॉय यांनी भाष्य केलं. भारताने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत केली आहे. आम्ही भारताच्या विरोधात असू शकत नाही," असे रॉय यांनी स्पष्ट केलं.