नवी दिल्ली - खलिस्तानबाबत कणव दाखवणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहेत.मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारताची एकता आणि अखंडतेला आव्हान देणे खपवून घेतले जाणार नाही, असे खडसावून सांगितले. फाळणीची बिजे पेरणाऱ्यांना इथे कोणतीही जागा नसल्याचे मोदी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी मोदी म्हणाले,"कॅनडाच्या पंतप्रधानांसोबत आमचे अनेक मुद्यांवर एकमत झाले आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन संरक्षण क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्याची गरज आहे. दहशतवाद आणि कट्टरतावादाचा भारत आणि कॅनडासारख्या लोकशाहीवादी देशांसाठी धोका आहे. त्यामुळे त्यांचा सामना करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद आणि कट्टरतावाद हा खपवून घेतला जाऊ शकत नाही." " ट्रूडो यांच्या भारत दौऱ्याची बऱ्याच काळापासून वाट पाहिली जात होती. त्यामुळे तुम्ही भारत दौऱ्यावर आला आहात याचा आनंद आहे. कॅनडामध्ये एक लाख 20 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आता दोन्ही देशांमधील नागरिकांना सुलभपणे ये-जा करता यावी यासाठी एमओयू ऑफ हायर एज्युकेशनवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत." असे मोदी म्हणाले.
खलिस्तान प्रश्नावरून नरेंद्र मोदींनी कॅनडाच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 5:55 PM