नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आरोपी असलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू आणि इक्बाल सिंग यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान खलिस्तानी संबंध असल्याचे समोर येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. (khalistan link revealed in initial questioning of sidhu and iqbal)
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू (Deep Sidhu) आणि इक्बाल यांना खलिस्तान किंवा खलिस्तानांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात होती का, याचा तपास सुरू आहे. दीप सिद्धूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुप्तचर विभागाकडूनही अनेक तास चौकशी करण्यात आली, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
मोदींच्या भाषणांमुळे सरकार-शेतकऱ्यांमधील कटुता मिटणार?
चाणक्यपुरीतील असलेल्या स्टेट सेल येथे सिद्धू आणि इक्बाल यांची चौकशी केली जात आहे. दोन्ही आरोपींना एकमेकांसमोर बसवून पोलीस चौकशी करत आहेत. तसेच प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत आहे. गुप्तचर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हे शाखा या दोघांची चौकशी करणार आहे. गुरुद्वारा आणि घरोघरी जाऊन कथावाचन करणाऱ्या इक्बाल सिंग याचीही या हिंसाचारात भूमिका असल्याची बाब उघडकीस आली आहे. इक्बाल याची फोन हिस्ट्री तपासली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काही पोलीस अधिकाऱ्यांनुसार, दीप सिद्धू याने २६ जानेवारी रोजी २० ते २५ जणांशी चर्चा केली. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतरही दीप सिद्धूने चार ते पाच जणाना संपर्क केला होता. दीप सिद्धूने चर्चा केलेले आणि हिंसाचारानंतर संपर्क साधलेल्या व्यक्ती नेमक्या कोण आहेत आणि त्यांमध्ये नेमके काय बोलणे झाले, याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकारी म्हणाले.