नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओद्वारे संसद भवनावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. माझ्या हत्येचा कट फसला आहे. मी १३ डिसेंबरला संसद भवनावर हल्ला करून प्रत्युत्तर देईन, असे , असे गुरपतवंत सिंग पन्नू याने व्हिडिओ जारी करून सांगितले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला केला होता. याच दिवशी गुरपतवंत सिंग पन्नूने संसदेवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे. जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये २००१ संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरु याचे पोस्टर आणि 'दिल्ली बनेगा खलिस्तान' शिर्षक वापरण्यात आले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सांगितले की, व्हिडिओची स्क्रिप्ट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या K-2 डेस्कने लिहिली असल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच, गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेष म्हणजे सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. १९ दिवस चालणारे अधिवेशन २२ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी गुरपतवंत सिंग पन्नूची हत्या करण्याचा भारतीय सुरक्षा यंत्रणांचा प्रयत्न अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे, असे वृत्त फायनान्शियल टाईम्सने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. तसेच, गुरपतवंत सिंग पन्नू च्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. निखिल गुप्ता यांना एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याने मदत केल्याचा देखील आरोप आहे. यासंबंधी माहिती समजताच भारताने तपासासाठी एक समिती स्थापन केलेली आहे.