पाकिस्तानात लपून बसलेला खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखबीर सिंग रोडे याचे २ डिसेंबर रोजी पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लखबीर सिंग रोडे हा ७२ वर्षांचा होता. दरम्यान, लखबीर सिंग रोडे याच्या निधनाची बातमी लीक होऊ नये, यासाठी त्याच्यावर पाकिस्तानात शीख प्रथेनुसार गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. लखबीर सिंग रोडे हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या होता.
लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सांगण्यावरून पंजाबमध्ये भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. तसेच, लखबीर सिंग रोडे हा खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) या भारतातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना पाकिस्तानमधून चालवत होता.
या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंजाबमधील राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोगाच्या कोठे गुरुपारा (रोडे) गावात छापा टाकला होता. त्यावेळी लखबीर सिंग रोडे याची मालमत्ता जप्त केली होती. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या कलम 33 (5) अंतर्गत लखबीर सिंग रोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लखबीर सिंग रोडे पाकिस्तानात लपून बसला होता आणि त्याला आयएसआयचा पाठिंबा होता.
पंजाबमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने अनेक स्लीपर सेल तयार केल्याची माहिती पंजाबच्या गुप्तचर यंत्रणांनी दिली होती, ज्याचा ते कधीही वापर करू शकतात. लखबीर सिंग रोडे यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यावर न्यायालयाने त्याच्या एकूण जमिनीपैकी 1/4 भाग सील करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार एनआयएच्या पथकाने त्याची जमीन सील केली आणि त्यावर सरकारी बोर्ड लावला होता.