नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवाद्यांची धरपकड करण्यासाठी काम करत असलेल्या सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. पंजाबमधील मोस्ट वॉटेंड गुंड आणि खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला भारतात आणण्यात आले आहे. सुख बिकरीवाल याला दुबईमधून डिपोर्ट करण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याला केलेली अटक गुप्तचर यंत्रणांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
सुख बिकरीवाल पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'च्या सांगण्यावरून पंजाबमध्ये हत्या घडवून आणत होता. शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आलेल्या पंजाबच्या बलविंदर संधू यांची हत्या सुख बिकरीवाल यांनेच केली होती, अशी माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे पंजाबमधील नाभा येथे कारागृहातील तोडफोडीत सुख बिकरीवालचा हात होता, असेही सांगितले जात आहे.
सुख बिकरीवाल याला भारतात आणले गेले असून, त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. पंजाबमधील खलिस्तानी नेटवर्क आणि अन्य मोठे खुलासे या चौकशीनंतर उघड होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंजाबमध्ये होत असलेल्या काही हत्यांचा तपास गुप्तचर यंत्रणांकडून पूर्ण करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'चा हात असल्याचे निष्पन्न झाले होते.
'आयएसआय'च्या सांगण्यावरूनच सुख बिकरीवाल याने पंजाबमधील शिवसेना नेते हनी महाजन यांच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले होते. सुख बिकरीवाल हा दुबईतून आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवाद्यांमधील दुव्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी दुबई पोलिसांनी सुख बिकरीवाल याला अटक केली होती. आता त्याला भारतात आणले गेले आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.