नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनीके याची कॅनडातील विनिपेग येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग नावाच्या फेसबुक पेजवर पोस्ट लिहून सुखाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. याबाबत साबरमती सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, लॉरेन्स बिश्नोई किंवा त्याच्या टोळीचा या हत्येची जबाबदारी असलेल्या फेसबुक पोस्टशी कोणताही संबंध नाही.
सुखा हा मूळचा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रहिवासी असून तो 2017 मध्ये बनावट कागदपत्रांद्वारे कॅनडाला पळून गेला होता. तो दविंदर बंबीहा टोळीशी संबंधित होता. लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बंबीहा गँग यांच्यात नेहमी गँगवॉर होताना दिसते. दरम्यान, साबरमती तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की, "गुरुवारी समोर आलेल्या फेसबुक पोस्टचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी काही संबंध नाही. जी कॅनडात झालेल्या सुखा दुनीकेच्या हत्येशी संबंधीत होती."
लॉरेन्स बिश्नोईला ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला साबरमती सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची दिल्लीतील तिहार तुरुंगातून साबरमती सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. सुखाच्या हत्येनंतर, पंजाबच्या बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरियाच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांनी हत्येची जबाबदारी स्वीकारण्यासाठी फेसबुकवर वेगवेगळ्या पोस्ट केल्या.
साबरमती सेंट्रल जेलच्या अधीक्षक श्वेता श्रीमाळी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, "लॉरेन्स बिश्नोई जेलमधून पोस्ट केली नसणार, कारण त्याच्या नावावर अनेक बनावट सोशल मीडिया अकाऊंट सुरू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती पोस्ट दुसऱ्याने केली असण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया पोस्टच्या संदर्भात, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की, ती त्याने पोस्ट केलेली नाही किंवा त्याने ती पोस्ट करण्यास संमती दिली नाही."
लॉरेन्स बिश्नोईला कोणी भेटायला आले नाही आणि कोणीही त्यांची संमती घेतली नाही. हे कोणीही असू शकते ज्याने ते त्याच्या परवानगीशिवाय पोस्ट केले आहे, असेही साबरमती सेंट्रल जेलच्या अधीक्षक श्वेता श्रीमाळी म्हणाल्या. दरम्यान, नवी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या बिश्नोईला सप्टेंबर 2022 मध्ये कच्छच्या जाखाऊ किनार्यावरून 194.97 कोटी रुपये किमतीचे 38.994 किलो हेरॉईन जप्त केल्याप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पहिल्यांदा ताब्यात घेतले होते.
ट्रान्झिट वॉरंटवर भटिंडा कारागृहातून आणल्यानंतर त्याच हेरॉईन जप्तीच्या प्रकरणात त्याच्यावर UAPA आरोप जोडल्यानंतर एटीएसने त्याला ऑगस्टमध्ये दुसऱ्यांदा ताब्यात घेतले होते. त्याला चार दिवसांच्या एटीएस कोठडीत पाठवल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत साबरमती सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपास पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले.