नवी दिल्ली : पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी हल्ले करण्याचा कट करीत असल्याचा दावा गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी केला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे प्रयत्न वाढवले आहेत. बब्बर खालसा आणि खलिस्तान जिंदाबाद फोर्ससारखे गट शस्त्रांस्त्राची तस्करी भारत-पाकिस्तान सीमेवरून करण्यासाठी पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांच्या (हँडलर्स) संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर विसंबून सरकारने सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास संस्था, रॉ, गुप्तचर विभागाला खलिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यास व पंजाबच्या सीमेवरील भागांतून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (जेईएम) उत्तर प्रदेशातील अयोध्येत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट करीत असल्याचे गुप्तचर सूत्रांनी बुधवारी सांगितले. जेईएमचा प्रमुख मसूद अझहर याचा हल्ल्याच्या कटाचा संदेश सुरक्षा यंत्रणांनी पकडला, त्यातून हल्ला केला जाणार हे सूचित होते. हा संदेश समाज माध्यमाच्या अॅपद्वारे फिरवला गेला. रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत हल्ला घडवण्याबाबत अझहर हा त्या संदेशात बोलला.