नवी दिल्ली : मणिपूरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायाच्या एका वरिष्ठ नेत्याने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूसोबत बैठक घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत.
कॅनडाच्या सरे येथील गुरुद्वारात आयोजित खलिस्तानी समर्थकांच्या बैठकीचा व्हिडीओ भारतीय यंत्रणांना मिळाला आहे. त्यात कुकी फुटीरतावादी नेता लीन गंग्ते हादेखील आहे. गंग्ते हा नॉर्थ अमेरिकन मणिपूर ट्रायबल असोसिएशनचा प्रमुख आहे. २ मिनिट २० सेकंदाच्या या व्हिडीओत तो उपस्थित लोकांना संबोधित करताना दिसतो. ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर खलिस्तानी नेटवर्कने हवालाद्वारे कोट्यवधी रुपये मणिपूरला पाठवले.
विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी ४ आरोपींना अटक
मणिपूरमधील एका किशोरवयीन विद्यार्थ्याचे आणि विद्यार्थीनीचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी ही माहिती दिली. आरोपींना कोठे नेण्यात आले याची माहिती त्यांनी दिली नाही.
कुकी नेत्यांना हवाय कॅनडात आश्रय
कॅनडातील गुरुद्वारातील कार्यक्रमात गंग्ते म्हणाला, जसे तुम्ही लोक खलिस्तानची मागणी करत आहात, त्याचप्रमाणे आम्हीही वेगळ्या मणिपूरसाठी लढत आहोत.
सरकारला मणिपूरमधील आमच्या समाजाच्या नेत्यांना नेस्तनाबूत करायचे आहे. या नेत्यांना कॅनडात राजकीय आश्रय द्यावा.
‘समान सत्तावाटप व्यवस्थेची गरज’
सुभाषचंद्र बोस यांचे नातू सुगत बोस यांनी मणिपूरमध्ये एकमत निर्माण करण्यासाठी ईशान्येकडील राज्यात न्यायसंगत समान सत्तावाटप व्यवस्था उभारण्याची गरज व्यक्त केली.
‘गृहमंत्र्यांनी संयुक्त बैठक घ्यावी’
मैतेई आणि कुकींमधील मतभेद दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घ्यावी, असे मणिपुरी अभिनेता कैकू म्हणाले.