लोकपाल निवड समितीचे निमंत्रण खरगेंनी नाकारले, तिसऱ्यांदा राहणार गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:28 AM2018-07-20T03:28:45+5:302018-07-20T03:29:38+5:30
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील लोकपाल निवड समितीच्या शुक्रवारी २० जुलै रोजी होणा-या बैठकीचे निमंत्रण लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले.
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील लोकपाल निवड समितीच्या शुक्रवारी २० जुलै रोजी होणा-या बैठकीचे निमंत्रण लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाकारले. याआधी १ मार्च व १० एप्रिल रोजी झालेल्या समितीच्या बैठकींनाही खरगे गेले नव्हते. लोकपाल कायद्यानुसार लोकपाल निवड समितीचे पंतप्रधान अध्यक्ष आहेत व त्यात लोकसभाध्यक्ष, सरन्यायाधीश किंवा त्यांचे प्रतिनिधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेता असे तीन सदस्य आहेत. सध्याच्या लोकसभेत कोणीही मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसल्याने त्याजागी सभागृहातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या गटनेत्याला सरकारकडून बैठकीला ‘विशेष निमंत्रित’ म्हणून बोलावले जाते.
मात्र खरगे यांनी ‘विशेष निमंत्रित’ म्हणून निमंत्रण नाकारले असून तिन्ही वेळेला तसे पत्र पाठवून कळविले आहे. ताज्या पत्रात सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवत खरगे यांनी लिहिले आहे की, ज्या वेळी मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नसेल तेव्हा त्याऐवजी सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करावा, अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचे ठरले होते. मात्र तशी दुरुस्ती न करता सरकार समितीच्या बैठकींसाठी मला ‘विशेष निमंत्रित’ म्हणूनच पुन्हा पुन्हा बोलावत आहे. त्यामुळे जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती करून पूर्ण सदस्य म्हणून निमंत्रित करणार नाही, तोपर्यंत समितीच्या बैठकींना हजर राहणे मला शक्य होणार नाही.
>पत्राची पोचही नाही
याआधीच्या दोन पत्रांमध्येही आपण हाच मुद्दा उपस्थित केला होता, पण सरकारने त्या पत्रांना साधी पोचही दिली नाही, यावर खरगे यांनी नाराजी नोंदविली.