काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे म्हणणाऱ्या मोदींवर खर्गेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजपाला मिळणार केवळ एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:16 AM2024-02-20T11:16:43+5:302024-02-20T11:17:27+5:30
Mallikarjun Kharge Criticize Narendra Modi: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किमान ४० जागा तरी मिळू देत म्हणून प्रार्थना करणाऱ्या नरेंद्र मोदींना मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सत्तेबाहेर जाणार असून, भाजपाला १०० जागासुद्धा मिळणार नाहीत, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत म्हणाले होते की, बंगालमधून चॅलेंज आलंय की, यावेळी काँग्रेसला ४० जागादेखील मिळणार नाहीत. मी प्रार्थना करतो की, काँग्रेसला ४० जागा तरी मिळू दे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे. अब की बार ४०० पार म्हणणाऱ्या भाजपाला टोला लगावताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, अब की बार भाजपा सत्तासे पार, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होणार आहे. तसेच भाजपा १०० जागासुद्धा निवडून येणार नाहीत. मोदींची गॅरंटी ही देशातील शेतकरी, दलित आणि मागासवर्गियांसाठी नाही आहे. तर ती मोदींच्या मित्रांसाठी आहे. ते केवळ कांघ्रेसला शिविगाळ करू शकतात.
यावेळी उद्योगपतींच्या कर्जमाफीवरून खर्गे यांनी मोदींवर टीका केली. मोदींच्या मित्रांचं १३ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांना १२-१३ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या कराव्या लागतात. मोदी सरकारच्या मागच्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या १० वर्षांच्या सत्ताकाळामध्ये धानाचा किमान हमिभाव १३५ टक्क्यांनी वाढलं होतं. तर भाजपा सरकारच्या कार्यकाळात ही किंमत केवळ ५० टक्क्यांनी वाढली आहे. ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या न्यायाबाबत बोलतो. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास किमान हमिभाव कायदा लागू केला जाईल, असं आश्वासन आम्ही देत आहोत, असेही खर्गे यांनी सांगितले.