काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ पक्ष चालवण्यासाठी आहेत. मात्र काँग्रेसचे नेते नेहमी गांधी कुटुंबीयच राहील, असं विधान सलमान खुर्शिद यांनी केलं आहे. या विधानावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ रिमोट कंट्रोल अध्यक्ष आहेत कि रबर स्टँप अध्यक्ष, असा सवाल भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विचारला आहे.
भाटिया म्हणाले की, अखेर सत्य समोर आले आहे. काँग्रेस चाटुकारिता आणि वंशवादावर विश्वास ठेवते. सलमान खुर्शिद यांच्या मते काँग्रेसचा अध्यक्ष कुणी बनो, पक्षाचं नेतृत्व हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडेच असेल. आता आम्ही मल्लिकार्जुन खर्गे यांना रिमोट कंट्रोल प्रेसिडेंट म्हणावं का की रबर स्टँप प्रेसिडेंट म्हणावं. सध्याच्या काँग्रेस अध्यक्षांकडे निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे.
गौरव भाटिया म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष तेच करतात जे गांधी कुटुंबीयांनी त्यांना सांगितले आहे. ही चाटुकारितेची पराकाष्ठा आहे. काँग्रेसमधील अंतर्गत निवडणूक ही केवळ एक दिखावा आहे. काँग्रेसचे नेते गांधी कुटुंबीया आहेत, असं विधान सलमान खुर्शिद यांनी एका मुलाखतीत केलं होतं. तेव्हापासून भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.