नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पडते की, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात, याची उत्सुकता आहे. कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांनी रविवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी अधिकृत केले, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
एका खासगी हॉटेलात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षप्रमुखांना नेता निवडीचे अधिकार देणारा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी, केंद्रीय निरीक्षकांनी एआयसीसीचे सरचिटणीस (संघटन) के सी वेणुगोपाल यांच्यासमवेत सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांची बैठक घेतली. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक कर्नाटकातील आमदारांचे मत पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले होते.
शिवकुमार-सिद्धरामय्या यांची नावे आघाडीवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे दोघेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी दोघांनीही आपल्या समर्थक आमदारांसोबत बैठक घेतली.
राममूर्ती १६ मतांनी विजयी बंगळुरूच्या जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवार सी. के. राममूर्ती यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी सौम्या रेड्डी यांचा १६ मतांच्या फरकाने पराभव केला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या नाट्यानंतर निकाल जाहीर झाला.
सुशीलकुमार शिंदेंसह ३ नेते निरीक्षक कर्नाटकात काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेसने रविवारी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे नेते जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. सायंकाळनंतर सीएलपीची बैठक सुरू होती.
अपक्ष आमदाराचा काँग्रेसला पाठिंबाहरपनहल्ली येथून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार लता मल्लिकार्जुन यांनी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे काँग्रेस समिती कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. लता मल्लिकार्जुन या ज्येष्ठ राजकारणी आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत एम. पी. प्रकाश यांच्या कन्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी सर्व काही व्यवस्थित झाले असून, लवकरच सरकार स्थापन होईल. राज्यातील जनतेची सेवा करणे हे काँग्रेसचे प्राधान्य आहे. पक्षाला कोणी मत दिले की नाही, याने पक्षाला काही फरक पडत नाही. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
भाजप करणार पराभवाचे विश्लेषणपराभवाची कारणे शोधण्यासाठी मतदारसंघनिहाय निकालांचे तपशीलवार विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव असल्याचा काँग्रेसचा दावा त्यांनी फेटाळून लावला.