नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) प्रमुख एचडी देवेगौडा यांनी गुरुवारी राज्यसभेतून काँग्रेस हायकमांडवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना थेट विचारले की, तुम्हाला या देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे का? पण, काँग्रेस हे सहन करू शकेल? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.
राज्यसभेतील निवृत्त सदस्यांच्या निरोपात सहभागी होताना JD(S) प्रमुखांनी खरगे यांच्या विधानावर आक्षेप घेतला. खरगे म्हणाले होते की, देवेगौडा यांनी नेहमी भाजपची साथ दिली. यावर देवेगौडा म्हणाले, आमचा भाजपला पाठिंबा, हा आमचा पक्ष उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या काही काँग्रेसवाल्यांपासून वाचण्यासाठी आहे. यावेळी त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंचा उल्लेख एक स्वच्छ प्रतिमेचा नेता असे केले.
काँग्रेसवर टीकादेवेगौडा यांनी 2019 मध्ये काँग्रेस-जेडी(एस) सरकार पडल्याबद्दल काही काँग्रेस नेत्यांना जबाबदार धरले. 2019 मधील एक घटना सांगताना देवेगौडा यांनी दावा केला की, कुमारस्वामी मुख्यमंत्री व्हावेत असा काँग्रेस हायकमांडचा आग्रह होता. पण, मी कुमारस्वामींना नव्हे तर खरगे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा सल्ला दिला होता. पुढे कुमारस्वामींचे सरकार अवघ्या 13 महिन्यांत कोणी पाडले? यात काँग्रेस नेत्यांचाच हात होता.
देवेगौडा पुढे म्हणाले की, मी आयुष्यात वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी कधीही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. काही काँग्रेसवाल्यांना पक्ष उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे मला माझा पक्ष वाचवण्यासाटी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावाही त्यांनी यावेळी केला.