पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एका प्रचार सभेला संबोधित करताना थेट काँग्रेसाध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांना निशाण्यावर घेत, काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे प्रभू श्रीराम आणि भगवान शिव यांच्यासंदर्भातील वक्तव्य अत्यंत 'खतरनाक' असल्याचे म्हणत, आता काँग्रेस हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तर खर्गे यांच्या या वक्तव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील भडकले आहे.
काय म्हणाले होते खर्गे? -पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी उल्लेख केलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचे ते वक्तव्य, छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा मतदार संघातील 30 एप्रिलच्या एका प्रचार सभेतील आहे. पक्षाचे उमेदवार शिवकुमार दहरिया यांच्यासाठी मते मागताना काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले होते, "त्यांचे नाव शिवकुमार आहे, ते रामाला बरोबरीत टक्कर देऊ शकतात. कारण ते शिव आहेत. माझे नावही मल्लिकार्जुन आहे, मी देखील शिव आहे. धार्मिक टीका (भाजपकडे इशारा करत) करून लोकांची दिशाभूल करू नका. लोक आता हुशार आणि सुशिक्षित झाले आहेत."
पंतप्रधान मोदींचा निशाणा- पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील भावनगर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, "काँग्रेसने हिंदूंच्या आस्थेत भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अत्यंत गंभीर विषयाला हात घातला आहे. त्यांनी भगवान श्रीराम आणि भगवान शिव यांच्या संदर्भात अत्यंत खतरनाक वक्तव्य केले आहे. ते अत्यंत वाईट उद्देशाने केलेले विधान आहे. हिंदू समाजात फूट पाडण्याचा डाव आहे. ते राम भक्त आणि शिवभक्तांमध्ये भेद करत आहेत. त्यांच्यात भेद निर्माण करून भांडण लावण्याची त्यांची इच्छा आहे. हजारो वर्षापासून चालत आलेली आपली महान परंपरा, राम असो, कृष्ण असो, शिव असो, जी मुघलांनाही तोडणं शक्य झालं नाही, मल्लिकार्जुन जी आणि काँग्रेस तोडण्याचा प्रयत्न करत आहे. तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी किती खाली जाणार? काँग्रेसवाल्यांनो ऐका, जो प्रभू रामचंद्रांना संपवण्यासाठी निघाला होता, त्याची काय अवस्था झाली?"
योगी आदित्यनाथही भडकले -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्यावरून भडकले आहेत. यासंदर्भात गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, 'काँग्रेस लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अत्यंत वाइट पद्धतीने पराभूत होत आहे आणि पराभवाचे हे दुःख काँग्रेस बहुसंख्यक हिंदू समाजाच्या आस्थेशी खेळून आणि अपमान करून व्यक्त करत आहे.'
एवढेच नाही तर, "काँग्रेसचा इतिहास अशा कृत्यांनी भरलेला आहे. काँग्रेसचे वास्तविक रूप समोर येत आहे. भारताच्या सनातन परंपरेचा अपमान करणे, तिची बदनामी करणे, भारताच्या श्रद्धेशी खेळणे, ही काँग्रेसची प्रवृत्ती आहे आणि काँग्रेस अध्यक्षांना काँग्रेसकडून जे संस्कार मिळाले आहेत, तसेच ते बोलत आहेत."