नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना त्यांच्या गृहराज्यात चीतपट केल्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या गृहराज्यातही त्यांची डाळ शिजू दिलेली नाही.
भाजप आणि काँग्रेसमधील सत्तासंघर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती केंद्रित झाला असला, तरी गेल्या सहा महिन्यांपासून त्याला जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील स्पर्धेचीही किनार लाभली आहे. सर्वशक्तिमान भाजप आणि गलितगात्र झालेल्या काँग्रेसदरम्यान चाललेल्या सत्तासंघर्षात खरगे यांच्या काँग्रेसने गेल्यावर्षी नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात सत्तेत असलेल्या भाजपला चारीमुंड्या चीत केले. त्यापाठोपाठ खरगे यांनी आपले गृहराज्य कर्नाटकात नड्डा यांची डाळ शिजू दिली नाही. कर्नाटकातही सत्ताधारी भाजप अलीकडच्या काळातील सर्वांत दारुण पराभव घडवून आणत खरगे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला स्वप्नवत वाटणारा विधानसभेतील लागोपाठ दुसरा विजय मिळवून दिला आहे.
महाराष्ट्राचे भाजप प्रभारी पराभूत; काँग्रेसचे विजयी -- कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचा संबंध महाराष्ट्राशीही आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रभारी सी. टी. रवी हेही नशीब आजमावत होते.
- चिकमगलूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले रवी पराभूत झाले असून, गदग विधानसभा मतदारसंघातून एच. के. पाटील विजयी झाले आहेत.