खरगोन – मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात सहा दशकांपूर्वी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने लग्नात दिलेले वचन पाळलं आहे. या पती-पत्नीमध्ये इतके प्रेम होते की, एकाच्या मृत्यूनंतर काही तासांतच दुसऱ्यानेही विरह सहन न झाल्यानं जीव सोडला. ८० वर्षीय पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ९० वर्षीय पतीनेही १२ तासांनंतर आयुष्याचा त्याग केला. गावात वाजत गाजत किर्तनासह दोघांची अंत्ययात्रा एकाचवेळी काढण्यात आली.
जिल्हा मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या देवळगावात १२ तासांच्या काळात वृद्ध दाम्पत्याने जीव सोडला. जवळपास ६० वर्षापूर्वी लग्नाच्या बंधनांत अडकताना या दोघांनी आयुष्यभर साथ देण्याचं वचन एकमेकांना दिले होते. हेच वचन अखेरच्या क्षणापर्यंत दोघांनी जपले. देवळगावात राहणाऱ्या ९० वर्षीय नागू गोस्वामी आणि ८० वर्षीय सीताबाई यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी एकाचवेळी गावातून निघाली. ८० वर्षीय सीताबाईचा मृत्यू रविवारी रात्री ८ वाजता झाला होता. तर १२ तासांनी सोमवारी सकाळी ८.१५ मिनिटांनी ९० वर्षीय नागू गोस्वामी यांचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी दोघांना अंतिम प्रवास चांगला राहो यासाठी भक्तीगीते लावून त्यांची अंत्ययात्री स्मशानभूमीपर्यंत नेली. याठिकाणी मोठा मुलगा कैलाशने वडिलांच्या आणि लहान मुलगा श्यामनं आईला मुखाग्नी दिला. या वृद्ध दाम्पत्याची अंत्ययात्रा एकाचवेळी गावातून निघाली. तेव्हा सर्वजण यात सहभागी झाले. अंत्ययात्रेत लाऊडस्पीकर लावत भजन, किर्तन लावली गेली. हे दोघंही भाग्यशाली आहे. ईश्वर खूप कमी जणांना एकत्र बोलवतो असं लोकांनी म्हटलं.
आयुष्य जगण्यासाठी केला संघर्ष
गोस्वामी दाम्पत्य एकत्र आदिवासी भागात जाऊन महिलांचे नाक-कान यात होल पाडण्याचं काम करत होते. त्यासोबत महिलांना लागणारं मेकअप साहित्य विकायचे. त्याशिवाय शेतावर मजुरी करायला जायचे. काबाडकष्ट करून या दोघांनी ४ मुले आणि २ मुलींचा सांभाळ केला. प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या ३ वर्षापासून दोघं घरीच होते.