चंदिगड - हरियाणा सरकारने गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या राज्यात असलेल्या मालमत्तेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव केशनी आनंद आरोडा यांच्यावतीने हरियाणामधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था विभागाला हा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २००५ ते २०१० या काळात गांधी-नेहरू कुटुंबीयांच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
हरियाणामध्ये २००५ ते २०१४ या काळात भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते. या काळात काँग्रेसच्या अनेक ट्र्स्ट आणि गांधी-नेहरू कुटुंबासाठी मोठ्या प्रमाणात मालमत्ता जमवण्यात आल्याचा आरोप आहे. यापैकी काही मातमत्तांची आधीपासून चौकशी सुरू आहे. आता केंद्र सरकारच्या पत्रानंतर गांधी-नेहरू कुटुंबाच्या इतर मालमत्तेच्या तपासाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
यासाठी एका समितीकडे तपास सोपवण्यात आला असून, ही समिती राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टच्या व्यवहारांचा तपास करणार आहे. यामध्ये मनी लाँड्रिंग आणि परदेशातून आलेल्या देणग्यांसह अनेक कायद्यांच्या कथित उल्लंघानाच्या प्रकरणांचा तपास केला जाईल. दरम्यान, या तपास समितीचे नेतृत्व ईडीच्ये एक विशेष संचालक करतील.
दरम्यान, या तपासावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मोदींना वाटते की संपूर्ण जग त्यांच्यासारखे आहे. त्यांना वाटते की कुणाचीही किंमत असते किंवा त्याला घाबरवता येऊ शकते. मात्र जे सत्यासाठी लढतात त्यांना खरेदी करता येत नाही किंवा घाबरवता येत नाही, हे मोदी कधी समजी शकणार नाहीत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.