चंदीगड, दि. 11 - गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणाला खट्टर सरकारनं सीबीआय चौकशीसाठी परवानगी दिली आहे. वाढत्या दबावाखातर खट्टर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. प्रद्युम्नच्या हत्येची कुटुंबीयांना अपेक्षित असणारी चौकशी करणार, असं आश्वासनही हरणायाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी प्रद्युम्नचे वडील वरुण ठाकूर यांना दिलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रद्युम्न हत्या प्रकरणात मनोहर लाल खट्टर यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे.नितीश पत्रकारांना म्हणाले, माझी खट्टर यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच त्यांना प्रद्युम्नच्या घरी भेट देण्याचीही विनंती केली आहे. त्यामुळे प्रद्युम्नच्या कुटुंबीयांना एक प्रकारची ताकद मिळेल. त्यांना आपल्यासोबत कोणीतरी असल्याचं वाटेल. तसेच प्रद्युम्नच्या हत्येत दोषी असलेल्यांना कडक शिक्षा करणार असल्याचंही खट्टर यांनी आश्वासन दिल्याचं नितीश कुमार म्हणाले आहेत. तसेच प्रद्युम्न हत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या रायन पिंटो यांनीही जामिनासाठी अर्ज केला आहे. प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत शाळा व्यवस्थापनेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रायन इंटरनॅशनलचे रिजनल हेड आणि एचआर हेड यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात सोहना पोलीस ठाण्याच्या एसएचओंना निलंबित करण्यात आलं आहे. रायन इंटरनॅशनल शाळा मंगळवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
रायन स्कूलमधील प्रद्युम्न हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी खट्टर सरकार तयार, नितीश कुमारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 2:38 PM