नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ऑलिम्पिकमध्ये अनेक भारतीय खेळाडू देशाचे नाव उंचावत पदके पटकावत आहेत. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे.
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, मोदींना टोला लगावत अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचा कडाडून विरोध होत आहे. त्यानंतर, आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहेत. ट्विटरवर 'भारतरत्न' हा ट्रेंड सुरू असून भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीच्याच नावे असायला हवा, असे म्हणत गंभीरने या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात यावे, अशी मागणीही गंभीर यांनी केली आहे. तसेच, हेही काम मोदी सरकारच करू शकते, असेही त्यांनी म्हटले
मोदींनी ट्विट करुन दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण भारतातील नागरिकांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कारने यापुढे ओळखले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.