चेन्नई : तामिळनाडूतील द्रमुक नेते शिवाजी कृष्णमूर्ती यांनी भाजप नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांना जुना ढोल संबोधल्याने वाद उफाळला आहे. या विराेधात वातावरण पेटल्यानंतर रविवारी कृष्णमूर्ती यांची पक्षातून गच्छंती करण्यात आली. त्यानंतर काही तासांनी पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले.
कृष्णमूर्ती यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांच्याबाबतही अलीकडेच वादग्रस्त टिप्पणी केली होती. ‘आम्ही दोन मंत्र्यांना आणखी काही खात्यांचे वाटप केले होते. तेव्हा हे चुकीचे असल्याचे सांगत आपण हा प्रस्ताव मान्य करणार नसल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. जर ते खरोखरच त्यांच्या आईच्या पोटातून जन्माला आले असते तर ते त्यांच्या शब्दांवर ठाम राहिले असते.
पण ते ठाम राहिले नाहीत. द्रमुकचे तसे नाही. तो जे काही बोलेल त्याला चिकटून राहतो. भलेही त्यासाठी मग त्याला प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर,’ असे विधान कृष्णमूर्ती यांनी केले होते. या टिप्पणीतून द्रमुकच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन घडते, अशी टीका खुशबू यांनी केली आहे.