मुंबई- उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खूशखबर आहे. एप्रिल महिन्यापासून मुंबई ते गोवा या मार्गावर क्रूझसेवा सुरू होत आहे. खरंतर जानेवारी २०१८ पासूनच ही सेवा सुरू होणं अपेक्षित होतं. पण काही तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे ही सेवा सुरू होत नव्हती. पण आता मात्र क्रूझसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच पर्यटकांना क्रूझमधून मुंबई-गोवा प्रवास करता येणार आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीने सी-ईगल ही खाजगी कंपनी ही क्रूझसेवा सुरू करणार आहे. या क्रूझमध्ये १५० ते २०० प्रवासी क्षमता आहे. तर क्रुझचं भाडे सुमारे एक ते दीड हजार रुपये असण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही क्रूझ सेवा सुरू होईल.
एप्रिल महिन्यात मुंबईतून अनेक जण गोव्याला सुट्ट्यांसाठी जातात. अशांसाठी रेल्वे, रस्ते किंवा विमानाने प्रवास करण्यापेक्षा समुद्रातून क्रुझने प्रवास करणं आवडीचं ठरू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजया भाटीया यांनी सांगितलं की, क्रूझ सुरू करण्यासंदर्भातील सर्व कां पूर्ण झाली आहे असून त्याचं परीक्षणही पूर्ण झालं आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच ही सेवा मुंबई-गोव्यामध्ये सुरू होईल.