जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्याच्या २१ वर्षीय मुलीचं अपहरण झालं असून, या घटनेला दोन दिवस उलटत आले तरी तिचा शोध लागलेला नाही. काँग्रेस नेते गोपाल केसावत यांची मुलगी सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता आहे. या प्रकरणी गोपाल यांनी सोमवारी रात्री प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र आता दोन दिवस उलटत आले तरी तिचा शोध लागलेला नाही.
दरम्यान, या प्रकरणी गोपाल केसावत यांनी सांगितले की, जर माझ्या मुलीच्या जागी कुण्या व्हीव्हीआयपीची मुलगी असती तर एवढ्यात तिचं सीसीटीव्ही चित्रण समोर आलं असतं. आम्हाला तिचं चित्रिकरण किंवा लोकेशन ट्रेस करण्याबाबत सांगण्यात आलेलं नाही. माझी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की, त्यांनी माझ्या मुलीला सुखरूपपणे घेऊन यावं. दोन तीन महिन्यांपूर्वी माझ्या कारच्या काचा तोडण्यात आल्या होत्या. तेव्हाही मी सुरक्षेची मागणी केली होती.
दरम्यान, मुलगी न सापडल्याने गोपाल केसावत मुलीचा फोटो घेऊन पोलीस कमिश्नरांच्या कार्यालयात पोहोचले. तसेच मुलीला सुखरूप परत आणण्याची मागणी करून त्यांनी आंदोलनास सुरुवात केली. यादरम्यान, ते अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल लांबा यांच्यासमोर ओक्साबोक्सी रडू लागले. पोलीस या प्रकरणामध्ये जंग जंग पछाडत आहेत. मात्र अपहृत मुलीबाबत अद्यापतरी काही सुगावा त्यांना लागलेला नाही.