नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व दिल्लीतील प्रसिद्धी अपोलो हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे किडनी विकणाऱ्या ३ लोकांशिवाय ३ दलालांनाही अटक केली आहे.सहपोलीस आयुक्त आर.पी. उपाध्याय यांनी या किडनी रॅकेटची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून, अनिस नामक व्यक्ती यामागील सूत्रधार आहे. तो किडनी प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्यांना बेकायदेशीरपणे किडनी विकत होता आणि यासाठी किडनी विकणाऱ्यांचीही व्यवस्था करीत होता. ज्या किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णाला ५० लाख रुपये मोजावे लागतात त्याच्या बदल्यात दात्याला केवळ ३ ते ४ लाख रुपये दिले जात होते हे या रॅकेटचा भंडाफोड झाल्यावर निदर्शनास आले आहे. गुरुवारी सहा डॉक्टरांना अटक केल्यावर या गोरखधंद्यात किडनीचे खरेदीदार आणि पोलिसांच्या भूमिकेचा शोध पोलीस घेत आहेत. दुसरीकडे एम्सच्या सूत्रांनी सांगितले की, किडनी विकणाऱ्या तीन आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांची किडनी काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
किडनी रॅकेटचा दिल्लीत भंडाफोड
By admin | Published: June 05, 2016 4:00 AM