भोपाळ - मध्य प्रदेश सरकारने अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांसाठी मध्यान्ह भोजनात अंडी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सरकारच्या या प्रस्तावावर भाजपाची अनेक नेतेमंडळी टीका करत आहेत. भाजपाचे नेते गोपाळ भार्गव यांनी ही मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या अंड्यांवरून कमलनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. मध्यान्ह भोजनात देण्यात येणारी अंडी खाल्ल्यामुळे मुलं नरभक्षक होतील असं अजब विधान भार्गव यांनी केलं आहे.
भार्गव यांनी भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील असं अजब विधान केलं आहे. 'एका कुपोषित सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? मुलांना अंडी खाण्यासाठी दिली जातील. मात्र जी मुलं अंडी खाणार नाहीत त्यांना जबरदस्तीने ते खायला सांगणार. मुलं कुपोषित राहिली तर त्यांना चिकन, मटण देखील भरवलं जाईल. भारताच्या संस्कृतीत जे सनातन संस्कार आहेत. त्यामध्ये मांसाहार करणं निषिद्ध आहे. जर तुम्ही मुलांना लहानपणापासूनच अंडी खाण्यासाठी दिली तर ते मोठे होऊन नरभक्षक होतील 'असं भार्गव यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी यांनी कुपोषणाशी लढण्यासाठी नोव्हेंबरपासून मध्यान्ह भोजनात अंड्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अंगणवाडीतील मुलांना आणि गर्भवती महिलांना अंडी देण्यात येणार आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या या प्रस्तावावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या आदेशावरून भाजपाचे नेते गोपाल भार्गव यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांथा राव यांनी दिले्या माहितीनुसार भार्गव यांनी केलेल्या विधानामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर त्याची नोंद घेत जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 30 सप्टेंबरच्या रात्री गुन्हा दाखल झाला होता. मध्यप्रदेश विधानसभेत भार्गव हे विरोधी पक्षनेते आहेत. ही पोटनिवडणूक काही सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यातील नसून ती पाकिस्तान आणि भारत यांच्यातील लढाई आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भार्गव यांनी केला होता.