बंगळुरू- गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने परशुराम वाघमारे नावाच्या एक व्यक्तीला हत्येचा आरोप ठेवत अटक केली आहे. एसआयटीच्या सुत्रांनुसार, गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबूली परशुराम वाघमारेने दिली आहे. 5 सप्टेंबर 2017 रोजी परशुरामनेच गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. 'धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे, असं मला मे २०१७ मध्ये सांगण्यात आलं. मी त्यासाठी तयार झालो. ज्या व्यक्तीला मारायचे आहे त्याच्याबद्दल माहीच माहिती नव्हतं, अशी कबुली परशुरामने दिल्याची माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
3 सप्टेंबर रोजी मला बंगळुरूत नेण्यात आलं. बंगळुरूत नेण्याआधी मला बेळगावात एअरगनद्वारे प्रशिक्षण देण्यात आलं होतं. हत्येच्याआधी तीन वेळा तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी दुचाकीवरुन गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेलं होतं. पण, ते तीन जण कोण होते, हे त्याने नाही, असं परशुरामने सांगितलं आहे.
'5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी जवळपास 4 वाजेच्या सुमारास मला बंदूक दिली गेली. माझ्या बरोबर असलेली एक व्यक्ती व मी गौरी लंकेश यांच्या घरी गेलो. आम्ही योग्य वेळेत त्यांच्या घराजवळ पोहचलो. त्यावेळी गौरी लंकेश यांच्या घराजवळ आल्या होत्या. मी त्यांच्या गाडीजवळ पोहचण्यावेळी त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला होता. त्याचवेळी मी त्यांच्यावर गोळ्या झाल्या. त्यानंतर आम्ही परतलो आणि मी त्याच रात्री शहर सोडलं. अशी माहिती परशुरामने पोलिसांना दिल्याचं समजतं आहे.