दीमापूर :
गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी स्थापन केलेल्या एसआयटीने एका मेजर रॅंकच्या अधिकाऱ्यासह ३० जवानांविराेधात आराेपपत्र दाखल केले आहे.
माेन जिल्ह्यातील ओटिंग-तिरु भागात ४ डिसेंबर राेजी ही घटना घडली हाेती. आसाम रायफल्सच्या २१ पॅरा स्पेशल फाेर्सच्या जवानांनी ही कारवाई केली हाेती. एसआयटीने दाखल केलेल्या आराेपपत्रात म्हटले आहे की, जवानांनी गाेळीबारादरम्यान मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नव्हते. एसआयटीने गुवाहाटी, हैदराबाद आणि चंडीगड येथील फाॅरेन्सिक तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण पुरावे गाेळा केले. त्यानंतर एक मेजर, दाेन सुभेदार, ८ हवालदारांसह ३० जणांविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मृतकांमधील बहुतांश जण काेळसा खाणीतील कर्मचारी हाेते. या घटनेनंतर ‘अफ्सपा’ कायदा हटविण्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यानंतर आसाम, मणिपूर आणि नागालॅंडमधील काही भाग या कायद्याच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आला आहे.
काय घडले हाेते त्या रात्री?प्रतिबंधित ‘एनएससीएन’ या संघटनेचे अतिरेकी तेथून जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने माेहीम राबविली. पहाटे ४.२०च्या सुमारास तेथे आलेल्या एका पिकअप वाहनावर अतिरेकी असल्याच्या संशयावरून जवानांनी गाेळीबार केला. यावेळी वाहनात बसलेले ७ जण जागीच ठार झाले हाेते. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जवानांवर हल्ला केला. त्यावेळी जवानांनी केलेल्या गाेळीबारात आणखी ७ जणांचा मृत्यू झाला.