कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या वासरांची हत्या? काँग्रेस नेत्यानं शेअर केला RTI
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:01 PM2021-06-16T15:01:58+5:302021-06-16T16:46:14+5:30
गाईच्या वासरांच्या सीरमचा उपयोग विरो सेल्सच्या रिवायल प्रोसेससाठी करण्यात येतो. सध्या कोव्हॅक्सीन लस बनविण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - कोरोनावरील लस कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी गाईच्या बछड्याच्या सीरमचा वापर केला जात आहे. त्यासाठी, 20 दिवसांपेक्षाही कमी वयाच्या बछड्यांना ठार मारण्यात येते. काँग्रेसचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर गौरव पांधी यांनी एका माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या आधारे हा दावा केला आहे. विकास पाटनी नावाच्या व्यक्तीने यासंदर्भात माहिती मागवली होती. त्यावर, सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (CDSCO) ने उत्तर दिले आहे.
गाईच्या वासरांच्या सीरमचा उपयोग विरो सेल्सच्या रिवायल प्रोसेससाठी करण्यात येतो. सध्या कोव्हॅक्सीन लस बनविण्यासाठी याचा वापर करण्यात येत आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या डोसमध्ये गाईच्या वासराचे सीरम असल्याचं मोदी सरकारने मान्य केलंय, असे पांधी यांनी म्हटलं. तसेच, हे अतिशय वाईट असून लस घेण्यापूर्वीच लोकांना याची कल्पना द्यायला हवी होती, असेही पांधी यांनी म्हटले आहे.
इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या रिसर्च पेपरमध्येही यापूर्वी हा दावा करण्यात आला होता. कोव्हॅक्सीन बनविण्यासाठी नवजात पशूच्या रक्ताच्या सीरमचा वापर केला जातो. यास पहिल्यांदाच कुठल्यातरी व्हॅक्सीनसाठी उपयोग करण्यात येत नाही. सर्वच बायोलॉजिकल रिसर्चचा हा एक भाग आहे. या रिसर्च पेपरमध्ये असा दावा करण्यात आला होता की, कोव्हॅक्सीनसाठी नवजात बछड्याचे 5 ते 10 टक्के सीरमसह डलबेकोचे मॉडिफाइड ईगल मीडियम (DMEM)चाही वापर केला जातो. DMED मध्ये अनेक आवश्यक पोषक असतात, जे पेशींसाठी महत्त्वाचे असतात.
लस बनविण्यासाठी यापूर्वी गर्भवती गायीच्या भ्रूणचा सीरम घेतला जात होता. त्यासाठी, गाईची हत्या करावी लागत होती. त्यानंतर, भ्रूणचे रस्क काढून ते लॅबमध्ये नेण्यात येत होते. तेथे रक्तातून सीरम वेगळे करण्यात येत होते. या निर्दयी प्रकियेमुळे वैज्ञानिकांनी नवजात वासरांचे सीरम काढण्याची नवीन प्रक्रिया विकसीत केली आहे. आता, 3 ते 20 दिवसांपर्यंतच्या नवजात वासराच्या रक्तापासून सीरम काढून ते लसीसाठी वापरले जाते.