श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने कायदेशीर कारवाई केली आहे. ओमर अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती यांना गेल्या 6 महिन्यांपासून नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. राज्यातील कलम 370 हटविल्यापासून या दोन्ही नेत्यांवर गृहमंत्रालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता, या दोन्ही नेत्यांवर पल्बीक सेफ्टी अॅक्ट लागू करण्यात आला आहे. त्यामुळे, या नेत्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवासही होण्याची शक्यता आहे.
मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर कलम 107 अन्वये पीएसए खटला दाखला करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना कुठल्याही ट्रायलशिवाय 3 महिने तुरुंगात टाकले जाऊ शकते. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे सरचिटणीस अली मोहम्मद सागर आणि पीडीपी नेते सरताज मदनी यांच्यावर पीएसए लागू करण्यात आला होता. या कायदेशीर कारवाईनंतर पीडीपीकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पीडीपीचे प्रवक्ता मोहित भान यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलंय. सरकारचा विरोध केला म्हणून प्रमुख नेत्यांवर अशी कारवाई निषेधार्ह असल्याचेही भान यांनी म्हटलंय.