श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा आणि अनंतनाग जिल्ह्णांतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र दलासोबत उडालेल्या भीषण चकमकीत चार अज्ञात दहशतवादी मारले गेले. दुसरीकडे राजौरी जिल्ह्णातील नियंत्रण रेषेलगत दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला.अनंतनाग जिल्ह्णाच्या असघमुकम भागात सोमवारी दुपारी उडालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सिलिगाम गावाला वेढा दिला तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यावेळी जवानांनीही गोळीबार केला, ज्यात हे दहशतवादी ठार झाले.दुसरी घटना कुपवाडा जिल्ह्णाच्या मनिगड जंगलात घडली. या भागात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी गेल्या ११ दिवसांपासून मोहीम राबविली जात आहे. सोमवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. यात एक दहशतवादी मारला गेला. गेल्या आठवड्यात याच मनिगडच्या जंगलात महाराष्ट्राच्या सातारा येथील कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले होते.दरम्यान, राजौरी जिल्ह्णातील नियंत्रणरेषेजवळही चकमक उडाली, ज्यात एक जवान शहीद झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सुदिमेश असे शहीद जवानाचे नाव असून तो केरळचा राहणारा आहे. दहशतवाद्यांनी सीमेवरील तारेच्या कुंपणाबाहेरून लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. (वृत्तसंस्था)
चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
By admin | Published: November 24, 2015 2:14 AM