उंदराला ठार मारल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या बदायू येथील मनोज कुमार (३०)च्या विरोधात पोलिसांनी स्थानिक न्यायालयात सोमवारी ३० पानांचे आरोपपत्र दाखल केले आणि सुमारे पाच महिने जुने हे ‘उंदीर हत्या’ प्रकरण पुन्हा देशभर चर्चेचा विषय बनले.
नोव्हेंबरमध्ये पनबडिया गावातील मनोजने घरातून उंदीर पकडून शेपटीला दगड बांधून नाल्यात बुडवून मारले. प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा यांनी घटनेचा व्हिडीओ टिपल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर आयव्हीआरआय, बरेली येथे उंदराचे पोस्टमार्टम करण्यात आले. रिपोर्ट आल्यावर विकेंद्र एफआयआर नोंदवण्यावर ठाम राहिले. अखेर पोलिसांनी प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. त्यानंतर कुमारला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर, पोलिसांनी उंदीर हत्या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला.
सुमारे पाच महिन्यांनी तपासाअंती पोलिसांनी मनोजविरुद्ध ३० पानी आरोपपत्र तयार केले. शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ पुरावा आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपपत्र दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर, ‘उंदीर-कावळे मारणे चुकीचे नाही. ते हानिकारक प्राणी आहेत. माझ्या मुलाला शिक्षा झाली तर कोंबड्या, बकऱ्या, मासे मारणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. उंदीर मारण्याचे औषध विकणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी’, असे कुमारचे वडील मथुरा प्रसाद म्हणाले. यावर आता कोर्ट काय निकाल देणार हे औत्सुक्याचे ठरणार असून नेटकऱ्यांमध्येही या घटनेबाबत चर्चा आहे.