श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरात पुलवामा येथे लष्काराच्या जवानांसाेबत उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. या भागात गेल्या आठवडाभरातील ही दुसरी माेठी कारवाई आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काकापाेरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली हाेती. त्यानुसार परिसराची नाकेबंदी करून कारवाई सुरू करण्यात आली. दहशतवादी घाट माेहल्ला परिसरातील एका तीन मजली इमारतीत लपून बसले हाेते. पाेलिसांनी दहशतवाद्यांना समर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गाेळीबाराने उत्तर दिले. त्यानंतर उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले. दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलिस ठेवले हाेते. त्यामुळे कारवाई लांबली, अशी माहिती काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. सुहैल निसार लाेन, यासीर वाणी आणि जुनैद अहमद अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हिसकावलेली रायफल घटनास्थळी ठार मारलेल्या दहशतवाद्यांपैकी दाेन जण भाजप नेते अन्वर अहमद यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात सहभागी हाेते, अशी माहितीही विजय कुमार यांनी दिली. या हल्ल्यात रमीझ राजा या पाेलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी हल्ल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले हाेते. त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कारवाई केली. रमीझ राजा यांच्याकडून हिसकावून नेलेलीरायफल दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्याचे विजय कुमार यांनी सांगितले. इतर दाेन दहशतवादी फरार असून, ते श्रीनगर येथील रहिवासी असल्याची माहितीही विजय कुमार यांनी दिली.
तीन दहशतवाद्यांचा खात्मा, भाजप नेत्याच्या घरावरील हल्ल्यात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:43 AM