जयपूर - गेल्या दोन वर्षांपासून जग कोरोनाशी झुंजत आहे. कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच राजस्थानमधील उदयपूर येथील जीबीएल जनरल रुग्णालयात एका महिलेमध्ये गंभीर आजार दिसून आला आहे. किम्युरा असे या महिलेमध्ये सापडलेल्या आजाराचे नाव आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या आजाराचा राजस्थानमधील हा पहिलाच रुग्ण असावा, कारण १९३७ पासून आतापर्यंत जगभरात या आजाराचे केवळ २००रुग्ण सापडले आहेत. जीबीएल जनरल रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेवर उपचार केले असून, ही महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे. तसेच तिला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.
किम्युरा या आजारामध्ये गळा आणि चेहऱ्यावर सूज आणि गाठी येतात. जीबीएच जनरल रुग्णालयाती ओपीडीमध्ये या महिलेला घेऊन तिचे नातेवाईक पोहोचले होते. ग्रुप डायरेक्टर डॉ. आनंद झा यांनी सांगितले की, डॉ. वीरेंद्र गोयल यांनी रुग्णाला पाहून नातेवाईकांना तिचा चेहरा आणि गळ्यावरील सूज तसेच गळ्यामधील गाठींची माहिती दिली होती. त्यानंतर या महिलेेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गाठीमधील द्रव्य घेऊन तिचा तपास केला असता, हा आजार किम्युरा असल्याचे निष्पन्न झाले.
ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे. पूर्णपणे बरी झाल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले आहे. डॉ. वीरेंद्र गोयल यांनी सांगितले की, या आजाराचा पहिला रुग्ण हा १९३७ मध्ये सापडला होता. तेव्हापासून आतापर्यंत संपूर्ण जगात या आजाराचे केवळ २०० रुग्ण सापडले आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हा आजार पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. महिलांमध्ये हा आजार फार कमी प्रमाणात दिसून आला आहे.
आता रुग्णालय व्यवस्थापनाने या महिलेच्या रोगाचे लक्षण आणि इलाजाच्या पद्धतीला मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशनासाठी पाठवला आहे. त्याबरोबरच डब्ल्यूएचओलाही केस रजिस्टर्ड करण्यासाठी पत्र लिहिले आहे. या महिलेवर उपचार डॉ. वीरेंद्र गोयल यांच्या नेतृत्वामध्ये डॉ. जीतेष अग्रवाल, डॉ. हरबीर छाबडा आणि मेडिसिन विभागाच्या टीमने केले.