ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - किंग ऑफ गुड टाईम म्हणून ओळखले जाणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी अखेर युनायटेड स्पिरीटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यूबी ग्रुपवर आता जगातील सर्वात मोठी मद्य कंपनी दियाजियोचे नियंत्रण आहे.
मल्ल्या यांनी राजीनामा देताना दियाजियोबरोबर करार केला आहे त्यानुसार पुढची पाचवर्ष दियाजियो मल्ल्या यांना ५१५ कोटी रुपये देणार आहे. यूनायटेड स्पिरीट कंपनीची स्थापना मल्ल्या यांच्या कुटुंबाने केली होती. मल्ल्या यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर बाजारात यूनाटेड स्पिरीटच्या समभागांच्या मुल्यामध्ये वाढ झाली आहे.
यूएसएल ग्रुपमधील एका कंपनीकडे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाची मालकी आहे. या कंपनीच्या संचालकपदावर विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थला कायम ठेवण्यात येणार आहे.
काही बँकांनी मल्ल्या यांचा कर्ज थकबाकीदारांच्या यादीत समावेश केला आहे. मल्ल्या यांनी बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीसाठी कर्ज घेतले होते. मल्ल्या आता इंग्लंडमध्ये आपल्या मुलांजवळ रहाणार आहेत.