नवी दिल्ली - दशकभरापूर्वीच्या 30 हजार कोटी रुपयांच्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा व द्रमुक नेत्या खासदार कनिमोळीसह 25 आरोपींची निर्दोष सुटका होताच तामिळनाडूतील द्रमुक कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष करण्यात आला. द्रमुक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. 'न्याय जिंकला' अशी घोषणाबाजी द्रमुक कार्यकर्ते करत होतो.
दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालायने दिलेल्या निकालाने माजी सीबीआय संचालक ए.पी.सिंह यांना धक्का बसला आहे. न्यायालयात सुनावणीच्यावेळी नेमके काय झाले ते मला माहित नाही. पण 2 जी स्पेक्ट्रमच्या वाटपात घोटाळा झाला होता. त्याचे पुरावेही आम्ही जमा केले होते अशी प्रतिक्रिया ए.पी.सिंह यांनी दिली. माजी मंत्री ए.राजासह, बडया कॉर्पोरेटसना अटक करण्यात ए.पी.सिंह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
काय आहे नेमके प्रकरण?संपुआ सरकारच्या काळात झालेल्या या स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात देशाच्या तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपाने यामुळे सरकारविरोधात केवळ संसदेतच नव्हे तर सर्व देशात सरकारविरोधात आंदोलने आणि विरोध प्रदर्शन केले होते. द्रमुक पक्षाचीही या महाघोटाळ्यामुळे मोठी नाचक्की झाली होती.
महालेखापरिक्षकांनी या घोटाळ्यात सरकारी तिजोरीचे १ लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे तेव्हा स्पष्ट केले असले तरी सीबीआयने मात्र या घोटाळ्यात केवळ ३० हजार कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत बोलताना सीबीआयचे माजी संचालक ए. पी.सिंग म्हणाले, या घोटाळ्याचा तपास करताना आमच्यावर सर्व बाजूंनी आमच्यावर दबाव होता, तत्कालीन सरकारने या स्पेक्ट्रम वाटपात काहीच नुकसान झाले नाही ( झिरो लाँस) अशी भूमिका घेतली होती मात्र आमच्या गणनानुसार यात ३०, हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. सीबीआयला पिंज-यातला पोपट म्हणणे योग्य नाही कारण याच काळात आम्ही इतर राजकीय नेत्यांवरील खटले व तपास यशस्वीरित्या पूर्ण केला होता.