Kiran Bedi: भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप फॉरवर्ड मेसेजच्या शिकार झाल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक चुकीचा व्हिडिओ शेअर केला असून, यावरुन त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. याआधीही त्यांचे काही ट्विट बरेच वादग्रस्त ठरले आहेत, जे तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे समोर आले आहे.
किरण बेदी यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये एक शार्क मासा उडणाऱ्या हेलिकॉप्टरवर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडीओवरील मजकुरात चुकीची माहिती लिहिली आहे. किरण बेदी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर लिहिले आहे - 'नॅशनल जिओग्राफिक चॅनलने 10 लाख रुपये खर्च करून या व्हिडिओचे हक्क विकत घेतले आहेत. हे अगदी दुर्मिळ आहे.' या व्हिडिओमुळे किरण बेदी यांच्यावरही जोरदार टीका होत आहे.
वास्तविक हा व्हिडिओ 2017 मधील '5 हेडेड शार्क अटॅक' चित्रपटातील एक दृश्य आहे. हा व्हिडिओ कोणीतरी चुकीची माहिती देऊन व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये नॅशनल जिओग्राफिक चॅनलबाबत केलेला दावाही चुकीचा आहे. या व्हिडिओनंतर किरण बेदींवरही जोरदार टीका होत आहे. किरण बेदीच्या या ट्विट खाली कमेंट करत युजर्सनी त्यांच्या दोन जुन्या ट्विटची आठवण करून दिली ज्यात त्यांनी चुकीची माहिती शेअर केली होती.
याआधी किरण बेदी यांनी ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, नासाने 'ओम' आवाजासह सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओनंतरही किरण बेदी यांना सोशल मीडिया यूजर्सकडून प्रचंड ट्रोल करण्यात आले.
किरण बेदी आणखी एका व्हिडिओमुळे ट्रोल झाल्या आहेत. त्यांनी एका वृद्ध महिलेचा नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता, परंतु नंतर त्यांनी आपली चूक सुधारली.