पुदुच्चेरी, दि.19- महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही पॉंडेचेरी सुरक्षित असल्याचा दावा नायब राज्यपाल किरण बेदी यांनी केला आहे. हा दावा त्यांनी दुचाकीवरुन केलेल्या दौऱ्यानंतर केला आहे. पुदुच्चेरी महिलांसाठी रात्रीच्यावेळेसही सुरक्षित असल्याचं आढळलं तरीही सुरक्षेसाठी अजून काही पावलं उचलावी लागतील असंही बेदी यांनी यावेळेस सांगितले. दुचाकीवरुन दौरा केल्यानंतर त्यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे.
दुचाकीवरुन प्रवास करताना किरण बेदी यांनी आपला चेहरा जास्तीत जास्त फडक्याने झाकून घेण्याचा प्रयत्न केला. नायब राज्यपाल स्वतः हा दौरा करत असल्याचे कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून ही खबरदारी त्यांनी घेतली असावी. मात्र त्यांचे या दुचाकी दौऱ्याचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. नायब राज्यपाल पदावर असणारी व्यक्ती हेल्मेटविना प्रवास कसा केला असा प्रश्न ट्वीटरवर विचारला जात आहे. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नियक्ती झाल्यापासून किरण बेदी यांच्याविरोधात सत्ताधारी कॉंग्रेसने अनेकदा तक्रारी केल्या आहेत. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनीही बेदी यांच्या निर्णयांवर टीका केली आहे. तसेच नायब राज्यपालांचे अधिकार कमी करण्यात यावे अशी मागणीही सत्ताधारी कॉंग्रेसद्वारे विधानसभेत मंजूर करण्यात आली. मध्यंतरी किरण बेदी यांचे हिटलरच्या रुपातील चित्रही पुदुच्चेरीमध्ये होर्डिंगवर लावण्यात आले होते.
पुन्हा निवडणूक लढणार नाही - किरण बेदी
शाही इमामाच्या फतव्यामुळे माझा पराभव किरण बेदी यांचा दावा
दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदी निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या. मात्र निवडणुकीत त्यांच्यासह पक्षाचा दारुण पराभव झाला होता. या निवडणुकीमध्ये भाजपाला केवळ तीन (आता पोटनिवडणुकीमुळे 4) जागा मिळाल्या होत्या. या पराभवानंतर बेदी यांना पुदुच्चेरीच्या नायब राज्यपालपदी नेमण्यात आले. किरण बेदी यांनी पोलीस प्रशासनात प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यामुळे तसेच तिहारसारख्या मोठ्या कारागृहाची जबाबदारी सांभाळल्यामुळे पुदुच्चेरीमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थीर राहिल असेही मत ट्वीटवर या दुचाकी दौऱ्यानंतर व्यक्त होत आहे.