ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते शांतीभूषण यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे कौतुक केल्याने आपमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. किरण बेदी या केजरीवालांइतक्याच चांगल्या असून त्यांना उमेदवारी देणे हा भाजपाचा मास्टरस्ट्रोक होता, मात्र त्या आपच्या उमेदवार राहिल्या असत्या तर आपल्याला आनंद झाला असता असे ते म्हणाले.
अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची भाजपाने मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून घोषणा केली होती. तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी धडाक्यात प्रचार सुरू केला. निवडणुकीदरम्यान केजरीवाल वि. बेदी असा सामना रंगलेला असतानाच 'आप'चेच ज्येष्ठ नेता असलेल्या शांती भूषण यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात खळबळ माजली आहे.
बेदी या धर्मनिरपेक्ष व प्रामाणिक असून उत्तम प्रशासक आहेत. त्या दिल्लीला नक्कीच भ्रष्टाचारमुक्त सरकार देतील अशा शब्दांत शांती भूषण यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच इंडिया अगेन्स्ट करप्शन मोहिमेतही त्यांचे मोठे योगदान होते त्यामुळे आंदोलनातील एखाद्या व्यक्तीस मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळाल्याबद्दल अण्णा हजारेंना आनंद व्हायला हवा असेही ते म्हणाले.