ऑनलाइन लोकमत
अटारी, दि. २० - किरपाल सिंगचा मृतदेह पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिला असला तरी, सरबजित सिंगप्रमाणेच किरपालच्या शरीरातील महत्वाचे अवयव गायब असल्याचे समोर आले आहे. सरबजितप्रमाणे किरपाल सिंगचा पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झाला.
किरपालचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा पाकिस्तानने दावा केला असला तरी, परिस्थितीजन्य पुरावे वेगळेच संकेत देत आहेत. सरबजित लाहोरच्या ज्या कोट लखपत जेलमध्ये होता त्याच तुरूंगात किरपाल सिंगलाही ठेवण्यात आले होते.
माझ्या काकांनीही देशासाठी बलिदान दिले. सरबजितच्या मृत्यू प्रकरणामध्ये ते एकमेव साक्षीदार होते. त्यांच्या जिवंत रहाण्यामुळे सत्य बाहेर येईल याची पाकिस्तानला भीती वाटत होती. म्हणून त्यांनी माझ्या काकांची हत्या केली असा आरोप क्रिपाल सिंगची पुतणी अश्वनीने केला आहे.
जिन्नाह रुग्णालयात ११ एप्रिलला किरपालचा मृत्यू झाला. मंगळवारी त्यांचा मृतदेह भारताच्या ताब्यात सोपवण्यात आला. भारतात करण्यात आलेल्या शवविच्छेदनात किरपालच्या शरीरातील ह्दय, लिव्हर हे महत्वाचे अवयव गायब असल्याचे समोर आले. २०१३ मध्ये पाकिस्तानी तुरुंगात मरण पावलेल्या सरबजितच्या मृतदेहाचे भारतात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळीही त्याच्या शरीरातील महत्वाचे अवयव गायब होते.
किरपालचा मृत्यू ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र किरपालचा मृत्यू संशयास्पद असल्याचा कुटुंबियांचा दावा आहे. १९९२ साली किरपाल पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर त्याला हेरगिरी आणि बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक झाली. त्याला फाशीची सुनावली होती. लाहोर उच्च न्यायालयाने त्याची बॉम्बस्फोटाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली पण हेरगिरीच्या आरोपाखाली त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.