नवी दिल्ली/मुंबई - गेल्या 10 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात होणारी वाढ आज झालीच नाही. त्यामुळे, गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीला काहीसा ब्रेक मिळाला आहे. मात्र, गेल्या 9 दिवसांत पेट्रोलच्या दरांत 5 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल प्रति लीटर 116.72 रुपये आणि डिझेल प्रति लीटर 100.94 रुपये एवढे आहे. निवडणुकांच्या निकालानंतर 20 दिवसांनी दरवाढ झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियातूनही आपला राग व्यक्त होत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरात आज भाववाढ झाली नसली तरी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रेंड होत आहेत. ट्विटरवर #ThankYouModiji असा हॅशटॅग ट्रेंड होत असून अनेकांनी इंधन दरवाढीवरुन मिम्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान, माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी नरेंद्र मोदींचं जुनं ट्विट व्हायरल केलं आहे. या ट्विटमध्ये मोदींनी पेट्रोल दरवाढीवरुन युपीए-2 सरकारवर निशाणा साधला होता. आझाद यांनी मोदींचे ते 23 मे 2012 चे ट्विट शेअर करत, हे खरं आहे, असा उपरोधात्मक टोला लगावला आहे.
सरकारने कमावले ३.३१ लाख कोटी
केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार, ऑईल डेपोपासूनच्या अंतरानुसार त्यांच्या किमती बदलतात.