दिल्लीतीलशेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेले राकेश टिकैत सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आहेत. टिकैत यांच्या एका आवाजावर हजारो शेतकरी 'आर या पार' लढाईसाठी सज्ज झाले आहेत. यामागे टिकैत यांच्या मोठ्या संघर्षाची कहाणी आहे. पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास त्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिल्ली पोलिसातील नोकरी सोडली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आतापर्यंत त्यांनी ४४ वेळा जेलवारी केली आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत असताना टिकैत यांचा एक भावनिक व्हिडिओ काल रात्री व्हायरल झाला. त्यानंतर आंदोलक शेतकरी पुन्हा एकदा नव्या दमानं दिल्लीच्या सीमेवर उभे राहिले आहेत. एकवेळ आत्महत्या करेन पण आंदोलन मागे घेणार नाही, अशी थेट घोषणा करुन टिकैत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना बळ दिलं. त्यानंतर आपलं सारं सामान घेऊन शेतकरी पुन्हा एकदा सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.
कोण आहेत राकेश टिकैत?शेतकरी नेते असलेले महेंद्रसिंग टिकैत यांचे ते पुत्र आहेत. राकेश टिकेत यांचा जन्म मुजफ्फरनगरच्या सिसोली गावात झाला. शेतकऱ्यांसाठी लढणारा नेते अशी त्यांची ओळख आहे. राकेश टिकैत सध्या भारतीय किसान युनियनची जबाबदारी सांभाळत आहेत. या संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणूनही ते काम पाहतात.
राकेश टिकैत यांनी मेरठ विद्यापीठातून एमए केले आहे. त्यांनी लॉ एलएलबीचा अभ्यासही केला आहे. तर १९९२ साली त्यांनी दिल्ली पोलिसमध्ये त्यांनी काम केले आहे. राकेश टिकैत यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असताना सरकारने आंदोलन थांबविण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. यावेळी राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत पोलिसाची नोकरी सोडली. त्यानंतर ते पूर्णवेळ शेतकरी संघर्षात सक्रिय झाले.
शेतकऱ्यांसाठी ४४ वेळा जेलवारीशेतकऱ्यांसाठीच्या न्याय हक्काच्या लढ्यात राकेश टिकैत आतापर्यंत ४४ वेळा तुरुंगात गेले आहेत. मध्य प्रदेशात भूसंपादन कायद्याविरोधातील आंदोलनात त्यांना ३९ दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं.
राकेश टिकैतच घेतात संघटनेचे महत्वाचे निर्णयराकेश टिकैत यांचे वडील आणि भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष महेंद्रसिंग टिकैत यांचं कर्करोगानं १५ मे २०११ रोजी निधन झालं. त्यानंतर महेंद्रसिंग टिकैत यांचा मोठा मुलगा नरेश टिकैत यांना संघटनेचं अध्यक्ष करण्यात आलं. राकेश टिकैत यांच्याआधीपासूच नरेश टिकैत या संघटनेमध्ये सक्रिय होते. पण नरेश टिकैत जरी अध्यक्ष असले तरी सर्व महत्वाचे निर्णय राकेश टिकैत घेत आले आहेत. शेतकरी आंदोलनाची रुपरेषा आजही राकेश टिकैत निश्चित करतात.
निवडणुकीतही नशीब आजमावलंराकेश टिकैत यांनी २००७ साली पहिल्यांदा राजकीय मैदानातही आपलं नशीब आजमावलं. २००७ मध्ये प्रथमच त्यांनी मुझफ्फरनगरमधील खतौली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदल पक्षाने त्यांना अमरोहा जिल्ह्यातून तिकीट दिले. पण लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.